पुणे : ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना राज्यभरातून आलेल्या शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शरद जोशी यांचे यांचे पार्थिव सकाळी दहा वाजता भिडे पुलाजवळील नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मंडपात ठेवण्यात आले होते. सकाळी अंत्यदर्शनासाठी आलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी पत्रकारांशी बोलत असताना या मंडपात जमलेल्या तसेच विदर्भातून आलेल्या शेतकर्यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 'संपूर्ण कर्ज मुक्ती द्या, आमचा नेता गेला आहे. आमच्या मागण्या मान्य करा' अशा घोषणा देत शेतकर्यांनी या वेळी टाहो फोडला. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनाही या रोषाला सामोरे जावे लागले. तावडे माध्यमांशी बोलत असताना, संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सरकार शेतकर्यांची फसवणूक करत आहे, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असतानाही, शेतकर्यांनी व्यत्यय आणला. 'भाजपाने आमची फसवणूक झाली आहे. भाजपा नेते केवळ गप्पा मारतात, आता तुम्हीच लक्ष घाला आणि आम्हाला कर्जमुक्ती द्या' अशा घोषणा शेतकर्यांनी दिल्या. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वैकुंठ स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नेत्यांकडे पाहून शेतकर्यांनी पुन्हा संपूर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
पुणे : शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष माजी खासदार शरद जोशी यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राज्यभरातून तसेच परराज्यातून आलेल्या हजारो शेतकर्यांनी 'शरद जोशी अमर रहे..' अशा घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी निरोप दिला. शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील दापोडी येथील देवी ऑर्चिड या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जोशी यांच्या पार्थिवावर दुपारी सव्वातीनच्या सुमारास वैकुंठ विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जोशी यांची मुलगी गौरी जोशी, श्रेया शहाणे, सुनील शहाणे, नात शमा व नातू आश्विन शहाणे उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार राजू शेट्टी, युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आमदार पाशा पटेल, महापौर दतात्रय धनकवडे, पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले हजारो शेतकरी उपस्थित होते. अंत्यदर्शनाला लोटला जनसागर जोशी यांचे पार्थिव सकाळी सव्वादहा वाजता भिडे पुलाशेजारील नदीपात्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, जालना, नांदेड, औरंगाबाद या भागातील शेतकरी, तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पररज्यातील शेतकरीही उपस्थित होते. या ठिकाणी मंडप उभारण्यात आला होता. या वेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रघुनाथ पाटील, खासदार वंदना चव्हाण, शेतकरी नेत्या सरोज काशीकर, सदाभाऊ खोत, म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, विश्वंभर चौधरी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी जोशी यांना आदरांजली अर्पण केली. दुपारी बारा वाजल्यानंतर उन्हाचा कडाका वाढला, तरीही मोठय़ा संख्येने शेतकरी अंत्यदर्शनासाठी येत होते. दुपारी दोन वाजता जोशी यांचे पार्थिव फुलांनी सजविण्यात आलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ठेवण्यात आले. त्यानंतर जोशी यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरवात झाली. भिडे पुलावरून ही अंत्ययात्रा केळकर रस्त्याने टिळक चौक, भारती विद्यापीठ भवन, गांजवे चौकमार्गे वैकुंठ स्मशानभूमीत दाखल झाली. सोबत आालेल्या हजारो शेतकर्यांना येथील जागा अपुरी पडली. अनेकजण स्मशानभूमीसमोरील आणि मागील बाजूस असलेल्या रस्त्यांवर उभे राहिले. या ठिकाणीही अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद जोशी यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता जोशी यांच्या पार्थिवाचे विद्युत दाहिनीत दहन करण्यात आले.
**********
क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्याच आंदोलनामुळे केंद्र सरकारने नाफेडची निर्मिती केली. महात्मा जोतिबा फुले यांच्यानंतर शेतकर्यांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले. त्यांची प्रेरणा मिळण्यासाठी राज्य सरकारने त्यांचे यथोचित स्मारक उभारावे.
- उदयनराजे भोसले, खासदार
**********
शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी शरद जोशी यांनी आंदोलने केली. खेडमध्ये त्यांनी शेती प्रश्नांच्या लढय़ाला सुरुवात केली. केंद्र व राज्य सरकारने धान्यांसह अन्य शेतमालास आधारभूत किंमत दिली पाहिजे आणि शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री
**********
शरद जोशी यांच्याशी माझा ३६ वर्षांपासून संबंध होता. देशभरातील शेतकरी संघटना जोडण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. देशभरातील शेतकरी परिवाराचे ते प्रमुख सदस्य होते. 'इंडिया विरुद्ध भारत' असा फरक त्यांनीच प्रथम दाखविला. त्यांच्या निधनाने देशभक्त शेतकरी नेता गमावला आहे. जनतेशी जोडलेले ते नेते होते.
- भूपेंद्रसिंग मान, माजी खासदार, पंजाब
**********
शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरित होवून मी चळवळीत ओढलो गेलो. पुढार्यांच्या बाबत मनात द्वेष असतानाही राजकारणात आले पाहिजे, असे ते म्हणत असत. नेत्यांसमोर येण्यास शेतकरी घाबरत असत. त्यांच्या छाताडावर बसण्याची हिंमत जोशी यांच्यामुळेच आली.
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
**********
शरद जोशी यांच्या अंत्यदर्शनासाठी शेतकरी संघटनेचे सर्व नेते एकत्र आले होते. सरकारमध्ये शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक घटक हवा, असे ते म्हणत. यापुढेही सरकारमध्ये प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्व संघटनांनी एकाच झेंड्याखाली यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
- रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना नेते
**********
शेतकर्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारा नेता, म्हणून नेता म्हणून शरद जोशी यांची ओळख होती. देश आणि राज्यात शेतकर्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.
- गिरीश बापट, पालकमंत्री
***
'इंडिया विरुद्ध भारत'मधील दरी दाखविणारा शेतकरी नेता
: नितीन गडकरी
*******
(लोकमत, पुणे मधून साभार)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शेतकर्यांच्या महात्म्याला दंडवत!
Posted by Gangadhar Mute on Tuesday, December 15, 2015
============
प्रतिक्रिया
अखेरची मानवंदना