नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



संपादकीय

"योद्धा शेतकरी" संकेतस्थळाचा उद्घाटन समारंभ 

नमस्कार मंडळी,

               आज दिनांक २२ जुलै २०१२ रोज रविवारला www.sharadjoshi.in "योद्धा शेतकरी" या संकेतस्थळाचा उद्घाटन समारंभ पार पडत आहे. शेतकरी संघटनेची स्थापना झाली आणि शेतकरी संघटनेचे अधिकृत कार्यालय उघडले गेले त्याला आज उणेपुरे ३० वर्ष होत आहेत. शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी चळवळ म्हणजे जगातील सर्वात मोठी शेतकरी चळवळ. ज्या शेतकरी चळवळीने शेतकरी समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला, परिस्थितीशी दोन हात करून संघर्ष करण्याचा शेतकर्‍यांमध्ये आत्मविश्वास जागवला, 

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

                  असा मंत्र देत नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला; त्याच शेतकरी संघटनेला आपले स्वतःचे संकेतस्थळ सुरू करून इलेक्ट्रॉनिक माध्यमात पदार्पण करायला मात्र ३० वर्षे वाट पाहावी लागली, हे जरासे विस्मयकारक असले तरी फारसे आश्चर्यजनक आहे असे मला वाटत नाही. शेतकरी संघटनेची वाटचालच मुळात जगावेगळी आहे. या संघटनेचा प्रथम नेता निर्माण झाला आणि त्यानंतर संघटनेची स्थापना झाली. त्यामुळे जसा नेता तसेच कार्यकर्ते शेतकरी संघटनेला लाभले. नेतृत्वच झुंजार, लढवय्ये आणि प्रत्यक्ष स्वतःचा जीव धोक्यात घालून रणांगण गाजवून इतिहास घडविणारे असल्याने या नेतृत्वाला अनुयायी कार्यकर्ते जे मिळाले तेही इतिहास लिहिण्यापेक्षा इतिहास घडविण्याचा अंगभूत पिंड असणारेच मिळाले. आपण केलेल्या शौर्याची गाथा आपल्याच मुखाने कथन करणे किंवा आपले स्वानुभव लिहून काढण्याविषयी हे सर्व कार्यकर्ते कायमच उदासीन राहिले आहेत. आमचे काम शेतकर्‍यांची काळ्या इंग्रजांच्या शोषणातून मुक्तता करण्यासाठी प्रसंगी स्वतःचे बलिदान द्यावे लागले तरी चालेल; पण रणांगणात लढून इतिहास घडविण्याचे आहे, इतिहास लिहिणारे इतिहास लिहीत बसतील, याच तर्‍हेची जवळजवळ सर्वच कार्यकर्त्यांची मनोभूमी तयार झाल्यानेच कदाचित शेतकरी संघटनेला साहित्य आणि प्रसारमाध्यमात पाय रोवण्यात फारसे यश आले नसावे.

                 आणखी दुसरे कारण असेही असू शकते की १९८० पासून सततची आंदोलने, मेळावे, तुरुंगवास, त्या अनुषंगाने न्यायालयीन हेलपाटे यातही ’घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणार्‍या’ बिनीच्या कार्यकर्त्यांचा मोठा वेळ खर्ची पडलेला आहे. त्यातूनही थोडीफार उसंत मिळाली असेल तर आपापल्या पातळीवर सतत शेतकरी संघटनेचा विचार मांडत आणि प्रचलित समाजमनाला कलाटणी देत नव्या विचारांचे प्रकटीकरण आणि प्रसार करण्यात करण्यातच सर्व कार्यकर्त्यांचा सर्व वेळ खर्ची पडला, याचीही नोंद घेणे गरजेचे आहे.
                 शेतकरी संघटनेत साहित्यिक, लेखक, कवी, शाहीर व पत्रकार तयार झालेच नाही, असेही नाही; पण शेतकरी संघटनेचा वैचारिक आवाका बघता ही संख्या मात्र नगण्यच म्हणावी लागेल. शेतकरी संघटनेला याविषयी जाणीव नव्हती किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न झाले नाही, असेही नाही; पण या प्रयत्नांना फारसे यश आले नाही, हे निर्विवाद आहे. शेतकरी संघटनेची ही बाजू कमकुवत नसती तर शेतकरी संघटनेची वाढ आणखी वेगाने आणि विचारांचा प्रभाव अधिक व्यापकपणे जाणवायला मदत झाली असती. मात्र आता उशीराने का होईना पण शेतकरी संघटनेने या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केलेली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. शेतकरी संघटक नव्या आकर्षक स्टॉल सेलेबल स्वरूपात प्रकाशित व्हायला लागला आहे. शरद जोशींनी आजवर केलेल्या लेखनाला आणि प्रकाशित पुस्तकांना जनशक्ती वाचक चळवळीने पुनर्मुद्रित करून वाचकांसमोर शरद जोशींच्या विचारांचे दालन खुले करून दिले आहे. मात्र शेतकरी संघटनेच्या विचारांना सातासमुद्रापार पोचवायचे असेल तर इलेक्टॉनिक माध्यमाचा वापर करून संकेतस्थळाची निर्मिती केल्याखेरीज पर्याय नाही, हे हेरून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री रविभाऊ देवांग यांनी त्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांचेच फलित म्हणजे या संकेतस्थळाची निर्मिती.
                 शेतकरी संघटनेचे संकेतस्थळ निर्माण करण्याची जबाबदारी रविभाऊंनी जेव्हा माझ्यावर सोपवण्याचा मनोदय व्यक्त केला, तेव्हा पहिल्या क्षणी मी तर गोंधळलोच. एवढ्या मोठ्या शेतकरी चळवळीला आणि शरद जोशींसारख्या महामानवाच्या कर्तबगारीला न्याय देऊ शकेल, अशा संकेतस्थळाच्या निर्मितीचे कार्य किती कठीण असू शकेल, याची जाणीव होणे, हेच माझ्या प्रथमदर्शनी गोंधळण्याचे प्रमुख कारण होते. पण इतिहास घडविण्याची सदैव ऊर्मी बाळगणार्‍या शूरवीर पाईकांच्या या संघटनेत इतिहासाचा लेखाजोखा मांडण्यासाठी खर्डेघाशी करणारांची किती वानवा आहे, हे मला पक्के ठाऊक असल्याने या कामास स्वतःची पात्रता पारखून नकार देण्याचे किंवा टाळाटाळ करण्याचे कारण आपोआपच संपुष्टात आले होते.
                 आज हे संकेतस्थळ प्रत्यक्षात आकार घेण्याच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत आहे. हे संकेतस्थळ परिपूर्ण करण्याचे कार्य वाटते इतके नक्कीच सहजसाध्य नाही. हे संकेतस्थळ म्हणजे शरद जोशी आणि शेतकरी संघटनेविषयी परिपूर्ण माहितीने ओतप्रोत भरलेला अनमोल खजिना व्हायला हवा. शरद जोशींच्या समग्र लेखनासहित अधिवेशने, मेळावे, रस्ता रोको अथवा रेल्वेरोको दरम्यान वेगवेगळ्या आंदोलनस्थळी घडलेल्या घडामोडीविषयीचे शक्यतो फोटोसहित सर्व वृत्तांत येथे उपलब्ध व्हायला हवेत.
आणि हे कार्य आपल्याला करायचेच. तुम्ही, मी आणि आपण सर्व मिळून. 
तर चला मग; 
आपण साकार करूया एका महत्त्वाकांक्षी संकेतस्थळाचा एक महाप्रकल्प......!

                                                                                                                                                                                              - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

  • Girdhar patil's picture
    Girdhar patil
    मंगळ, 24/07/2012 - 09:08. वाजता प्रकाशित केले.

    आता वैचारिक मंथन जोमाने व्हावयास हवे.

    गि़रधर पाटील

  • संपादक's picture
    संपादक
    शुक्र, 17/08/2012 - 21:48. वाजता प्रकाशित केले.

    होय सर.
    सर्वांना बोलते करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. Smile

    शेतकरी तितुका एक-एक....!