नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.शेतकरी प्रकाशन

शरद जोशी यांची ग्रंथ संपदा...

मा. शरद जोशी यांनी 1980 ते 2010 या काळात केलेले सर्व लिखाण एकूण पंधरा पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेले आहे. सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झालेली त्यांची पुस्तके ‘शेतकरी प्रकाशनाने’ सिद्ध केली होती. ती सर्व पुस्तके तसेच काही पुस्तिकाही नव्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 1. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती 

शेतकरी संघटनेच्या परिवारात ज्या पुस्तकाला ‘शेतकर्‍यांची गीता’ म्हणून आजही समजल्या जातं ते पुस्तक म्हणजे ‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’. मुळात हे पुस्तक म्हणजे अंबाजोगाई (जि.बीड) येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात शरद जोशी यांनी केलेल्या भाषणांचे संकलन आहे. सटाणा (जि. नाशिक) येथे शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन संपन्न झाल्यावर लगेचच अंबाजोगाई येथील मोरेवाडीचे श्रीरंगनाना मोरे यांनी एका शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या सर्व कॅसेट्स प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे व प्रा. सुरेश घाटे (अलिबाग) यांनी उतरवून काढल्या.  या सगळ्या लेखांचे संकलन म्हणजे हे पुस्तक. 52 शेतकर्‍यांचं आंदोलन 1980 साली उभं राहिलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेतकरी आंदोलनाने आपले उद्दिष्ट सुरवातीलाच स्पष्टपणे सांगितले आहे. ‘केवळ शेतकर्‍यांचा फायदा करून देणे हे या आंदोलनाचे उद्दिष्ट नसून सर्व देशातील गरिबी हटवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.’ अशी स्वच्छ मांडणी शरद जोशींनी सुरवातीपासून केली आहे. शेतकरी आंदोलनाची मुख्य उभारणी ही शेतमालाच्या भावाबाबत पहिल्यांदाच शास्त्रशुद्ध भूमिका घेत झाली. भुईमूग, कांदा, ऊस, तंबाखू, दूध, ज्वारी अशा विविध शेतमालाच्या उत्पादन खर्चाचे आकडे देत प्रत्यक्ष मिळणार्‍या भावाची तुलना या पुस्तकाच पहिल्यांदाच करण्यात आली. उत्पादन खर्च भरून निघत नाही याचं विवेचन करत असताना ‘तूट असेल तर लूट आणि मुबलकता असेल तर लिलाव’ हे धोरणही मांडण्यात आलं आहे. 
इंडिया आणि भारत ही संकल्पना म्हणजे शहर विरुद्ध खेडं असं नसून ‘आर्थिकदृष्ट्या या देशाचे असे दोन भाग पडले आहेत की ज्याच्यामधील एक भाग हा दुसर्‍या भागाच्या शोषणावरच जगतो आहे आणि सतत जास्तीत जास्त शोषण करीत चालला आहे आणि दुसर्‍या भागाचं मात्र शोषण होतच आहे. शोषक म्हणजे इंडिया आणि शोषित म्हणजे भारत’. शेतकरी संघटनेनं ‘शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव’ या एक कलमी मागणीवर आपलं सगळं आंदोलन उभारलं आहे. ही सगळी मांडणी शरद जोशींनी सविस्तर उलगडून दाखवली आहे. तसेच आंदोलनाचे तंत्रही समजावून सांगितले आहे. 
वर्धा येथे संपन्न झालेल्या शिबीरच भाषणाचे संकलन ‘भारतीय शेतीची पराधिनता’ या नावाने करून ती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. या पुस्तकाला परिशिष्ट म्हणून ही पुस्तिकाही जोडली आहे. विविध मुद्दे घेऊन त्यावर चर्चा केली आहे. पुढे जी प्रमुख मागणी शेतकरी संघटनेने केली ती मुक्त बाजारपेठेची मागणी या पुस्तकात स्पष्टपणे नोंदवली आहे.

2. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश

विविध साप्ताहिके, नियतकालिके यांत प्रकाशित झालेले शरद जोशींचे मराठी व इंग्रजी लेख शोधून त्याचे पुस्तक प्रा. अरविंद वामन कुलकर्णी व सुरेशचंद्र म्हात्रे यांनी सिद्ध केले. पूर्वी दोन भागात असलेले हे पुस्तक आता एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहे. शेतकरी संघटनेचा विचार आणि एकसूत्री कार्यक्रम ही एक संपूर्ण विचारपद्धती आहे. एका वर्गाच्या प्रासंगिक स्वार्थाचे हे तत्त्वज्ञान नाही. समाज एकत्र बांधल्या जातो तो वस्तू आणि सेवांच्या परस्पर देवघेवीने. या देवघेवीच्या शर्ती इतर कोणत्याही घटकांपेक्षा समाजातील संबंध ठरवितात. प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर पहिला आर्थिक स्वरूपाचा व्यवसाय निर्माण झाला तो शेती. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा हा एकमेव व्यवसाय आहे. वाहतूक, व्यापार, साठवणूक, कारखानदारी या क्षेत्रांत देवघेवीच्या मूल्याची वृद्धी होऊ शकते. पण उपभोग्य वस्तूंचा गुणाकार फक्त शेतीतच होऊ शकतो.’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच शरद जोशी यांनी शेतीसंबंधी आपली भूमिका आणि दृष्टिकोन सैद्धांतिक पातळीवर इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे. या विचारांमध्येच त्यांच्या सगळ्या मांडणीचे सूत्र सापडते. या पुस्तकांत शरद जोशी यांनी शेतकरी संघटक या पाक्षिकांत वेळोवेळी लिहिलेले लेख प्रामुख्याने समाविष्ट आहेत. 
‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये शेतकरी संघटनेच्या संबंधाने सलग तीन दिवस अग्रलेख लिहिले गेले. (9,10,11 ऑक्टोबर 1985) या अग्रलेखांना उत्तर देत शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्रच शरद जोशींनी मांडले आहे. 30 वर्षानंतर शरद जोशींची मांडणी किती दूरगामी होते हे यावरून स्पष्ट होते. 

3. चांदवडची शिदोरी: स्त्रियांचा प्रश्न

चांदवड (जि.नाशिक) येथे 10 नोव्हेंबर 1986 रोजी महिलांचे ऐतिहासिक अधिवेशन संपन्न झाले. आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने ग्रामीण महिला कुठेही जमलेल्या नाहीत. ग्रामीण स्त्रियांच्या प्रश्नाबाबत आणि एकूणच स्त्रीप्रश्नाच्या संदर्भात अतिशय वेगळी अशी मांडणी या निमित्ताने केल्या गेली. ‘चांदवडची शिदोरी’ या नावाने एक छोटी पुस्तिका त्या वेळी काही महिला कार्यकर्त्यांच्या साहाय्याने शरद जोशींनी स्वत: सिद्ध केली होती. त्यानंतर या प्रश्नावर त्यांनी विविध प्रसंगी लिहिलेले लेख एकत्र करून 160 पानांचे हे पुस्तक शरद जोशींच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात 2 ऑक्टोबर 2010 रोजी रावेरी जि. यवतमाळ येथे प्रसिद्ध झाले. चांदवडचे महिला अधिवेशन, अमरावती येथील महिला अधिवेशन, बेजिंग परिषद या निमित्ताने लिहिलेले लेख तसेच महाराष्ट्र शासनाचे महिला धोरण, महिला आरक्षण व वारसाहक्कासंबंधी भूमिका या संदर्भातील लेखही यात समाविष्ट आहेत. ‘मुक्ताईने केले ज्ञानेशा शहाणे’ या नितांत सुंदर लेखात एकूणच महिला चळवळीचा आढावा घेताना शेवटी शरद जोशी लिहीतात, ‘20 वर्षांमध्ये कितीतरी प्रसंग घडले. वेगवेगळ्या वेळी स्त्रियांचे प्रश्न निर्माण झाले की मी सर्वसाधारण अडाणी, अशिक्षित स्त्रियांच्या बैठका बोलविल्या, त्यांच्या पुढे माझे प्रश्न -होतील तितक्या सोप्या शब्दांत- मांडले आणि मांडल्यावर, त्यांच्याकडून प्रतिक्रियांची अपेक्षा केली. सुरुवातीला त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळविणे हेच काम कठीण होते. त्याकरिता बरीच मशागत करावी लागली. पण ती एकदा केल्यानंतर भरभरून पीक आले. या माझ्या शेतकरी बहिणींनी मला जे भरभरून ज्ञान दिले त्याची तुलना फक्त मुक्ताईने ज्ञानेशांना केलेल्या ज्ञानसंबोधनाशीच होऊ शकते.’

4. शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख :

शिवाजी महाराजांच्या राजवटीचे विश्लेषण शेतकर्‍यांच्या दृष्टिकोनातून करण्याचा अतिशय मोलाचा प्रयत्न या पुस्तकात शरद जोशींनी केला आहे. इतिहासात बळीराजा नंतर फक्त शिवाजी महाराजच असे राजे होते ज्यांना शेतकर्‍याचा राजा म्हणता येईल. पुरंदराच्या तहाचे जे विश्लेषण यात आले आहे ते विलक्षण बोलके आहे. ‘12 जून 1665 रोजी शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करली. अहंकार, प्रतिष्ठा ही गौण ठरली व रयतेची सुरक्षितता ही श्रेष्ठ ठरली. रणभूमीतील परिस्थिती पाहता शरणागतीची आवश्यकता नव्हती. 12 जून ही तारीखही महत्त्वाची आहे. हे आगोठीचे दिवस. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पुढे शेतीच्या पेरणीचे दिवस येतात. धुमश्चक्री थांबली नाही आणि शेतकर्‍यांची सबंध शेती जर तशीच पडून राहिली तर थोरल्या दुष्काळाप्रमाणे (स.1628-30) रयतेची अन्नान्नदशा होईल ही भीती आ वासून उभी राहिली असणार. नंतरच्या पुरंदरच्या तहानंतर त्या परिसरात शेतकरी आपल्या कामास लागले व शांतता निर्माण झाली.’ पुरंदरच्या तहाचे असे विश्लेषण आतापर्यंत कोणीच केले नव्हते. शिवाजी महाराजांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत अतिशय स्वच्छ दृष्टी होती. ती तशी आजच्या राज्यकर्त्यांनाही नाही असे स्पष्टपणे शरद जोशींनी प्रतिपादले आहे. 
या पुस्तकात शेतकर्‍याचा आसूड शतकाचा मुजरा ह्या पुस्तिकेचाही समावेश केला आहे. महात्मा फुल्यांच्या या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या दुसर्‍या अधिवेशनात ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत शरद जोशी म्हणतात, ‘शेतकर्‍याचा आसूड’ व त्यात मांडलेली शेतकर्‍यांच्या शोषणाची कहाणी हा फुले-मताचा पाया आहे. विश्वाच्या उपपत्तीपासून उत्पादक समाजाचे हिंसाचाराने झालेले शोषण हे ज्योतिबांच्या विचाराचे मध्यवर्ती सूत्र आहे. आजच्या डाव्या विचारवंतांनाही आकलन न झालेले शेतकरी समाजाचे स्पष्ट चित्रण ज्योतिबांनी अगदी विदारकपणे मांडले. हे सत्य त्यांना प्रत्यक्ष टोचले म्हणून जाणवले. ज्योतिबांच्या मांडणीतील मर्यादाही शरद जोशींनी स्पष्ट केल्या आहेत. ‘..ज्योतिबांना शेतकर्‍यांच्या शेाषणातील सनातनता जाणवली होती; पण समजली नव्हती. या शोषणाचे ‘भटशाही’ हे तत्कालीन स्वरूप अपिरहार्य भाग म्हणून होते. हा शोषक कधी दरवडेखोराच्या रूपांत येतो, कधी जमीनदार सावकाराच्या, कधी भटाभिक्षुकाच्या, कधी राजा महाराजांच्या, कधी इंग्रजांच्या, कधी स्वकीय राज्यकर्त्यांच्या, हे त्या काळात त्यांना उमगले नाही. शेतकर्‍यांचा शोषक भट पुढे आपल्यात शूद्रच काय अतिशूद्रही सामील करून घेईल, शिक्षणाचा प्रचार करील; पण शेतकर्‍यांचे शोषण सोडणार नाही. कारण शेतीच्या शोषणाखेरीज त्याला सोईस्कर असा भांडवलनिर्मितीचा मार्गच नाही. हे ज्योतिबांना समजले नाही.’ 
‘शेतकरी कामगार पक्ष : एक अवलोकन’ ही पुस्तिकाही या ग्रंथात समाविष्ट आहे. 1987 साली ही पुस्तिका शरद जोशींनी लिहिली होती. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न शेकापने सर्वांत आधी उठवला होता. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळावा ही मागणी शेकापने अनेक वर्षांपूर्वी केली होती. त्यासाठी जागोजाग चळवळी केल्या होत्या, आंदोलने केली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेचा विचार समजून घेतला. इतर कार्यकर्त्यांना हा विषय कळावा यासाठी त्यांनी यावर लिखाण करण्याचा आग्रह शरद जोशींकडे धरला. यातून ही पुस्तिका तयार झाली. गावांतील कुणबी शेतकर्‍यांपेक्षा शहरातील नोकरदार मुले आणि त्यांचे हितसंबंधी हेच त्यांना अधिक जवळचे वाटत होते. शेतकर्‍यांना कामगारांच्या चळवळीला जुंपून घेणे हाच त्यांचा खरा उद्देश होता. पण शेतीमालाच्या भावाच्या महत्त्वाची जाण शेतकरी कामगार पक्षाच्या गावागावांतील हजारो कार्यकर्त्यांना फार चांगली होती. त्यांच्या आग्रहाखातर शेतीमालाच्या भावाचा प्रश्न कसाबसा सामावून घेण्यात आला. शेतीमालाचे भाव हे शेतकरी कामगार पक्षाचे कृत्रिमरीत्या चिकटविले मातीचे कुल्लेच होते. असा सडेतोड आणि स्पष्ट निष्कर्षही शरद जोशींनी नोंदविला आहे. 
‘शोषकांना पोषक: जातीयवादाचा भस्मासुर’ ही पुस्तिका 1990 मध्ये प्रकाशित झाली होती. भारतीय जनता पक्षाने देशपातळीवर बाबरी मशीद अयोध्या जन्मभूमी प्रश्नावर एक जे उन्मादक वातावरण निर्माण केले होते त्याला ठामपणे विरोध शेतकरी संघटनेने केला. त्यामागची भूमिका ही ‘जातीयवादी चळवळी नेहमीच अर्थवादी चळवळींना धोका निर्माण करतात. ही सगळी व्यवस्था पोशिंद्यांना घातक ठरते.’ असं शरद जोशी मांडत होते. 1947 मध्ये जातीयवादाच्या वावटळीत देशाची फाळणी झाली. परत तेच वातावरण हिंदुत्ववादी संघटना निर्माण करीत आहेत. पंजाबमध्ये खलिस्तानचा चिघळलेला प्रश्न, त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधींची झालेली हत्या व नंतर आलेल्या लोकसभा निवडणुका. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेला केलेले आवाहन, नांदेडच्या पोटनिवडणुकीत भारीपचे नेते मा. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ केलेले भाषण या सर्व लेखांतून शरद जोशींनी जातीयवादी चळवळींना निर्माण केलेला धोका स्पष्टपणे मांडला आहे. 

5. स्वातंत्र्य का नासले?

भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा शासकीय पातळीवर स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशपातळीवर प्रश्नांचे चिंतन करण्यासाठी 11 लेख शरद जोशींनी लिहिले. त्याचेच हे पुस्तक. या पुस्तिकेत स्वराज्य आंदोलनातील वेगवेगळ्या प्रवाहासंबंधी एक नवीन उपपत्ती आणि मांडणी करण्यात आली आहे. काँग्रेस ही मूळची शहरी, पाश्चिमात्य विचारसरणी आणि जीवनशैली यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्यांची आघाडी. गांधीजींनी तिलाच अध्यात्म आणि सर्वोदय यांचा मुलामा दिला आणि सत्याग्रहाचे हत्यार दिले. स्वातंत्र्योत्तर परिस्थितीचे विश्लेषण करताना शरद जोशींनी ‘‘स्वातंत्र्य मिळाले आणि सारी सत्ता पाश्चिमात्य प्रभावाखालील सवर्णांकडे गेली. त्यांनी ‘भटशाही’ समाजवाद तयार केला. 40 वर्षे समाजवादाचा उद्घोष झाला. नंतर, समाजवादापेक्षा खुल्या व्यवस्थेतून उच्चवर्णीयांचे भले अधिक होण्याची संभावना दिसू लागली तेव्हा अप्रतिहत व्यवस्थेचा पुरस्कार सुरू झाला. पण, उच्चवर्णीयांत उद्योजकत्वाची धडाडी दाखविण्याची कुवत नाही हे स्पष्ट झाले. स्पर्धेसाठी समतल मैदान असण्याची भाषा सुरू झाली. नोकरशहा, कामगार, गुंड आणि पुढारी एकत्र झाले आणि पुन्हा एकदा सरकारशाहीच्याच मार्गाने जाण्याचा कार्यक्रम बनत आहे.’’
कारखानदारी, रेल्वे, सुरक्षाव्यवस्था यातील धोरणे देशाच्या प्रगतीला कशी मारक राहिली याचे सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे. स्वातंत्र्याचा झेंडा फडकण्याआधीच लुटला गेला. स्वातंत्र्याचा आणि फाळणीचा माउंटबॅटन यांनी केलेला प्रस्ताव काँग्रेसने स्वीकारला त्यामागे इंग्रजांपासून लवकरात लवकर स्वतंत्र व्हावे या भावनेपेक्षा हिंदुस्थानातील बहुजन समाजाची सत्ता देशात येऊ नये, प्रस्थापित श्रेष्ठींचेच राज्य पुन्हा स्थापन व्हावे ही बुद्धी अधिक प्रबळ होती. थोडक्यात, ज्योतिबा फुल्यांच्या शब्दात ‘एकमय लोक’ या अर्थाने राष्ट्र उभे राहिले नसताना इंग्रज निघून गेले; त्यामुळे पुन्हा एकदा थोड्याफार फरकाने ‘पेशवाई’ची स्थापना होण्याची तयारी झाली.

6. खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने

खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटनेने केले. 1991 साली तर असे चित्र होते की शेतकरी संघटना वगळता कोणीच डंकेल प्रस्तावाचे समर्थन करण्यास तयार नव्हते. खुली व्यवस्था, उदारीकरण, जागतिकीकरण, डंकेल प्रस्ताव, जागतिक व्यापार याबाबत अतिशय सूत्रबद्ध सोप्या भाषेत जवळपास 17 लेख शरद जोशींनी शेतकरी संघटक या पाक्षिकात लिहिले होते. 1991 ते 2000 या जवळपास दहा वर्षात हे लेख लिहिले गेले आहेत. या सगळ्या मांडणीला आधार म्हणून ‘स्वतंत्रतेची मूल्ये’ या नावाने लिहिलेले चार लेख याच पुस्तकाला परिशिष्ट म्हणून जोडले आहेत. ‘जगाचे कप्पे कप्पे करणार्‍या क्षुद्र भिंती कोसळलेल्या असतील म्हणजे विचार, सेवा आणि वस्तू यांची देवघेव निर्वेधपणे होणे ही स्वतंत्रतेची महत्त्वाची अट आहे.’ इतक्या सोप्या भाषेत स्वतंत्रतेचे तत्त्वज्ञान शरद जोशींनी मांडले आहे. खुलीकरणाला अजूनही विरोध करणार्‍या डाव्या विचारवंतांनी हे चारच लेख मनात कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वाचावेत. 
अगदी दार्शनिकांच्या पातळीवर जाऊन स्वातंत्रतेची व्याख्या मांडताना, ‘दार्शनिकांनी ब्रह्मतत्त्वाचे वर्णन करताना ‘हे नाही हे नाही’ म्हणजे ‘नेति नेति’ एवढीच व्याख्या दिली. स्वतंत्रतेची व्याख्या अशीच ‘नेति नेति’ आहे. आजचे हे बंधन नको, ही बेडी नको. उद्याची नवी बंधनेही आम्ही झुगारू. कोणतेही मत, कोणताही महात्मा, कोणतेही पुस्तक त्रिकालाबाधित वंद्य आणि पूज्य असूच शकत नाही. जन्माच्या अपघाताने मिळालेला कोणताही गुणावगुण दंभ मिरवण्याच्या लायक नसतो. ही स्वातंत्र्याच्या उपासकाची प्रवृत्ती आहे. स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवणे, संकुचितपणाचा वाढता संकोच करणे एवढीच स्वतंत्रतेची व्याख्या देता येईल.’ असा तात्त्विक पायाही आपल्या विचारांना शरद जोशींनी देऊन ठेवला आहे. 

 
7. अंगारमळा

शरद जोशींची भाषा मुळातच शैलीदार, ओघवती आणि सोपी आहे. त्यांनी आत्मचरित्रात्मक असे मोजकेच लेख लिहिले आहेत. आठवड्याचा ग्यानबा साप्ताहिकात त्यांनी दोन लेख ‘अंगारमळा’, ‘माझी ब्राह्मण्याची गाथा’1988 मध्ये लिहिले होते. ते अतिशय गाजले. त्यांनी असेच लिखाण करावे अशी अपेक्षा होती पण तसे घडले नाही. या आत्मचरित्रात्मक लेखांसोबतच त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे आणि इतर काही लेख अशा 15 लेखांचा हा संग्रह.
अंगारमळा या पहिल्याच लेखात सुरवातीच्या दाहक अनुभवांबाबत लिहिताना ‘झोपी जातांना चिंतांची तोटी बंद करून झोपी जायचं ही माझी फार जुनी कला आहे. झोप लागताना सगळ्या चिंतांचा आणि तणावांचा काही त्रास झाला नाही. रात्री अडीचतीन वाजता मात्र झोप खाडकन खुले. पुढे झोपणेच अशक्य होई. कपाळाला हात लावून मी स्वत:लाच विचारी, ‘मी पाहतो आहे ते खरं की स्वप्न?’ आसपास शांतपने झोपलेल्या लीला, श्रेया, गौरीकडे पाहून पोटात गलबलून यायचं. यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार होता? त्याग म्हणजे रूपयापैशांचा नसतो. त्याग अशा अनेक दाहक क्षणांनी गुंफलेला असतो.
शेतकरी आंदोलनात काम करताना जातीची अडचण शरद जोशींनी जाणवत राहिली. ‘माझ्या ब्राह्मण्याची गाथा’ सारख्या लेखात ‘चोखामेळ्याला मंदिरात प्रवेश करायला ब्राह्मणांनी बंदी केली. शेतकरी कामाच्या मंदिरात प्रवेश करायला नवे ब्राह्मण नव्या चोखामेळ्याला अडथळा आणताहेत. अशी ही ‘नाथाच्या घरची उलटी खूण’ आहे.’ असं त्यांनी नोंदवले आहे. ‘इति एकाध्याय’हा आईवरचा अतिशय अप्रतिम लेख आहे. स्वत:च्या दुखण्यावरच्या लेखात आपल्या कुटुंबीयांच्या आधी शेतकरी संघटनेचे बिल्लेवाले पोचलेले पाहून ‘हे तुझे खरे कुटुंब. आम्ही रक्ताचे नात्याचे; पण आम्हीसुद्धा इतक्या त्वरेने धावून आलो नाही.’ हे आपल्या भावाचे वाक्य लिहून खरंतर स्वत:च्याच भावना व्यक्त केल्या आहेत. 
आपले अतिशय जवळचे सहकारी शंकरराव वाघ यांच्यावर छोटासा पण फार सुंदर लेख यात आहे. तशी भावनाप्रधानता शरद जोशी लिहिताना टाळतात. म्हणूनच क्वचित कधी त्यांच्या लिखाणात ओलावा येतो तो जास्तच परिणामकारक वाटतो. ‘..सध्या संघटनेचे काही निकडीचे काम लवकर निघायची शक्यता नाही हे हेरून शंकरराव गेलेले दिसतात. त्यांची ओळख झाली ते पूर्वजन्मीचा ऋणानुबंध असल्यासारखी. पुढच्या कोणत्या तयारीसाठी शंकरराव निघून गेले, कळायला आज काहीच साधन नाही.’ शंकररावांवरच्या लेखाचा हा शेवट त्यामुळेच फार हृद्य वाटतो. बुलढाण्याचे शेवाळे गुरुजी असो, बाबुलाल परदेशी असोत, कामगार नेते दत्ता सामंत असो यांची व्यक्तिचित्रे रेखाटताना चळवळीचाही एक इतिहास शरद जोशी मांडत जातात. बाबुलाल परदेशीवरचा लेख तर सर्वात उत्तम. 
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेले पत्र त्यावेळी फारच गाजले. आज पन्नाशीत असलेल्या बर्‍याच कार्यकर्त्या मित्रांच्या तेव्हाचा हॉस्टेलच्या खोलीत या पत्राची छापील प्रत पोस्टर्स सारखी लावलेली असायची. ‘सीतेच्या शोधात गेलेल्या हनुमानासारखी तुझी स्थिती आहे. रावणाच्या वैभवाला भुलून त्याच्या पदरी चाकरी स्वीकारणार का भूमिकन्या सीतेला सोडवण्यासाठी प्राण पणाला लावणार’ हा त्यांनी शेतकर्‍याच्या पोराला केलेला सवाल आजही या कार्यकर्त्यांच्या मनात सलत असतो. 
‘शेतकरी आंदोलन आणि साहित्यिक’ हा लेख तसेच ‘मी साहित्यिक नाही’ हा लेख म्हणजे साहित्य संमेलनातील भाषणे आहेत. या लेखांना साहित्यिक नियतकालिकांनी मोठी प्रसिद्धी दिली होती. आजही साहित्य आणि चळवळ याबाबत वाङ्मयीन पातळीवर या लेखांची चर्चा होत राहते. ‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ या अंतर्नाद मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाने मोठीच खळबळ माजवली होती. आपल्या विचाराची एकूणच दिशा स्पष्ट करताना तसेच त्याला वैयक्तिक अनुभवांची जोड देत, शेतकरी चळवळीतील मोठा अनुभव पट मांडत शरद जोशींनी सामाजिक कार्याची अतिशय परखड अशी केलेली चिकित्सा असे या लेखाचे स्वरूप आहे. 

8. जग बदलणारी पुस्तके

‘दैनिक देशोन्नती’मध्ये एक अतिशय सुंदर आणि वेगळ्या विषयावरचे सदर शरद जोशींनी चालवले होते. ‘जग बदलणारी पुस्तके’ असे त्या सदराचे नाव होते. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बौद्धिक पातळी उंचावण्यासाठी, त्यांना चांगले वैचारिक खाद्य मिळावे म्हणून प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात यायचे. अशा कार्यकर्त्यांना अवांतर वाचनासाठी द्यायचा मजकूर म्हणून ही लेखमाला लिहिल्याचे शरद जोशींनी सांगितले आहे. थॉमस पेन्स, ऍडम स्मिथ, थोरो, डार्विन यांच्या सैद्धांतिक जडजंबाळ पुस्तकांच्या सोबतच रॉबिन्सन क्रूसो किंवा जॉर्ज ऑरवेलचे ‘ऍनिमल फार्म’ या मनोरंजनात्मक पुस्तकांचाही समावेश यात केलेला आहे. फायद्याच्या प्रेरणेने चालणारी बाजारपेठेची व्यवस्था टिकूच शकणार नाही, या मार्क्सच्या मांडणीला विरोध करणार्‍या मायझेसच्या ‘समाजवादी नियोजनाचे आर्थिक गणित’ या पुस्तकावरही लेख यात समाविष्ट आहे. माझसेने सांगितले होते की अर्थव्यवस्थेत सामूहिक नियोजन ही कल्पनाच भोंगळ आणि चुकीची आहे, समाजवादी नियोजनाच्या व्यवस्थेतील निर्णय हमखास चुकीचे असतात, अशा चुकीच्या निर्णयांवर आधारलेली व्यवस्था फार काळ टिकणे अशक्य आहे. शेतकरी संघटनेच्या सर्व अर्थशास्त्राची भूमिका प्रामुख्याने हीच असल्याचे या अनुषंगाने शरद जोशींनी नोंदवले आहे. 
दहा वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखमालेत आजच्या काळात ‘द सेल्फिशी जीन’ व ‘द गॉड जीन’ या पुस्तकांचा समावेश मी केला असता असं प्रस्तावनेत लिहून शरद जोशींनी लिहून आपल्या विचारांची दिशा स्पष्ट केली आहे.
9. अन्वयार्थ भाग 1 व भाग 2
शरद जोशी यांनी प्रामुख्याने पाक्षिक शेतकरी संघटकसाठी लिखाण केले. त्याशिवाय दै. लोकमतमध्ये इ.स. 1992 ते 1994  आणि इ.स. 2000 ते 2001 या काळांत ‘अन्वयार्थ’ या सदरामध्ये लिखाण केले. हे लेख त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार लिहिल्या गेलेले आहेत. हे स्फूट लेख आहेत, तरीही सगळ्यांमध्ये सूत्र म्हणून शेतकरी संघटनेचा मध्यवर्ती विचार आहे. किंबहुना शरद जोशींच्या विचारांचाच जो धागा आहे तो स्वतंत्रतावादी विचारांचा आलेला आहे. ‘स्त्री चळवळीची पीछेहाट’सारखा लेख असो, की पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताशी छेडलेल्या छुप्या युद्धाचा विषय असो, घटनेतील नववे परिशिष्ट असो, की चीनमधील एकेकाळी सर्वगुणसंपन्न असलेला आणि मग काळाच्या ओघात खलनायक ठरलेला माओ असो... या सगळ्यांवरती अतिशय ओघवत्या शैलीत आणि मोजक्या शब्दांत शरद जोशींनी लिहिले आहे.  सदराची शब्दमर्यादा असल्यामुळेही हे सर्व लेख छोटेखानी आहेत.
‘मालकाला विकणारे नोकरदार’ किंवा ‘नोकरदारांची मगरमिठी’ अशा लेखांतून अवाढव्य वाढलेल्या नोकरशाहीचा नेमक्या शब्दांत त्यांनी उपहास केला आहे. ‘काळ्या आईला सोनेरी प्रणाम’सारख्या लेखात शेती सोडणार्‍या शेतकर्‍यांची मानसिकता फार व्यवस्थित आणि योग्य शब्दांत आली आहे. ‘इंडिया आणि भारत’ ही द्वंद्व रेषा सगळ्या धोरणांमधून कशी स्पष्ट दिसते हेपण विविध लेखांमध्ये आलेले आहे. एखादा विचारवंत प्रत्यक्ष चळवळीत भाग घेतो आणि मग त्याचं सगळं पांडित्य त्या अनुभवातून अजूनच लखाखून निघतं. विविध विषयांवरची त्याची मतं त्याच्यामुळेच महत्त्वाची ठरतात. त्यातच जर त्याला चांगली शैली लाभली असेल, तर विचारायलाच नको. हाच अनुभव शरद जोशींची ही दोन पुस्तके वाचताना येतो.

10. माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो

शेतकरी आंदोलनात जाहीर सभांमधून एक फार चांगलं संबोधन शरद जोशी वापरतात आणि ते म्हणजे ‘माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो’ त्यांच्या विविध भाषणांचा संग्रह जेव्हा प्रसिद्ध झाला, त्याला स्वाभाविकच हे सुंदर नाव देण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथील 1981 मध्ये केलेल्या भाषणापासून 2009 मध्ये परभणी येथे केलेल्या भाषणापर्यंत 29 भाषणांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक! 28 वर्षांमधील वैचारिक मांडणी अतिशय स्पष्टपणे यात आलेली आहे. सर्वसामान्य अडाणी शेतकर्‍याला मायमाउल्यांना शेतीचे अर्थशास्त्र, आंदोलनाचे तंत्र, शेतीचे भवितव्य हे विषय समजावून सांगण्याचे मोठे कौशल्य शरद जोशींना लाभले. त्याचा प्रत्यय ही भाषणं वाचताना येतो. कुठलाही आवेश न बाळगता संथ लयीत आपला मुद्दा समोरच्याला पटवून देण्याची शैली हे वाचतानाही जाणवत राहते. ज्यांनी कधी शरद जोशींची भाषणे ऐकली असतील त्यांना हे पुस्तक वाचतानाही त्या अनुभवाचा पुनर्प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मांडणीत एक विशिष्ट सातत्य शरद जोशींनी राखले आहे. त्यांच्यावर टीका करणार्‍यांनी ही भाषणं वाचली तरी त्यांना सहज त्याचा प्रत्यय येईल.  ‘‘शेतकर्‍यांचा प्रश्न अगदी सोपा आहे. आम्हाला सरकारचे फुकटाचे दवाखाने नको, फुकटाच्या शाळा नको, घरावर सोन्याची कौले घालून देतो म्हणाल तरी नकोत, फक्त आमच्या शेतीमालाला रास्त भाव द्या...’’ ही भाषा इ.स. 1981 ची आहे. ज्या भाषेने अडाणी शेतकर्‍याला शहाणे केले ती इ.स. 2009 मध्येसुद्धा तशीच आहे. त्याच सोपेपणाने नवीन आव्हाने सामान्य शेतकर्‍यांना समजावून सांगत आहेत.

11. बळीचे राज्य येणार आहे

‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकातील मांडणी 1988 च्या आधीची आहे. त्यानंतर शेती आणि शेतकरी आंदोलनांबद्दल जवळपास पन्नासएक लेख शरद जोशींनी लिहिले. हे सर्व पाक्षिक शेतकरी संघटकमधून प्रसिद्धही झाले. इतकंच नाही. शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात ‘साप्ताहिक वारकरी’मध्ये ‘शेतकर्‍यांची संघटना : अडचणी व मार्ग’ ही लेखमालाही त्यांनी लिहिली होती. त्यातच शेतकरी समाज हा मूलत: स्वतंत्रतावादी आहे. हे त्यांनी स्पष्ट नोंदवले होते. 1991 नंतर शेतकरी संघटनेवर डंकेल प्रस्तावाचे समर्थन केल्यामुळे जी टीका झाली, त्यांनी हा दाखला बघायला हवा. हे सर्व लिखाण ‘बळीचे राज्य येणार आहे’ या पुस्तकात समाविष्ट केलेले आहे. खेड्यापाड्यांतील मायमाउल्या ‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असं म्हणत राहतात. हीच घोषणा शेतकरी संघटनेत ‘इडा-पिडा टळणार आहे, बळीचे राज्य येणार आहे’ म्हणून फार लोकप्रिय झालेली आहे. त्या अनुषंगानेच पुस्तकाचे नाव ‘बळीचे राज्य येणार आहे’ असे ठेवण्यात आले आहे. पुस्तकाची विभागणी चिंतन, आंदोलन, सहकार आणि कर्जबळी अशा चार विभागांत करण्यात आली आहे. शेतकरी चळवळीच्या एकजूटीचा निकडीचा काळ असा शेवटचा लेख म्हणजे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते श्रीरंगनाना मोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त केलेले भाषण आहे. ‘‘कुटुंबप्रमुख म्हणून मी माझी चूक मानतो आणि तुमची माफी मागतो आणि परत या अशी हाक देतो. शेतकर्‍यांच्या दृष्टीने पुढचे दिवस अत्यंत कठीण आहेत. शेतकर्‍यांमध्ये ही फूट पाडण्याची वेळ नाही.’’ 2008 साली काढलेले हे उद्गार आज जेव्हा शेतकरी संघटनांच्या एकीची गोष्ट मांडली जाते त्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायला हवे.
कापूस, दूध, साखर आणि पतसंस्था यांचा सहकाराने केलेला बट्ट्याबोळ अगदी सुरुवातीपासून शरद जोशींच्या टीकेचा विषय ठरला आहे. साखर उद्योग निर्बंधमुक्त करा ही मागणी फार आधीपासून शेतकरी चळवळीने लावून धरली आहे. सहकारामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले जे आता सगळ्यांनीच एकापरीने मान्य केले आहे. सर्व लेखांच्या खाली तारखा दिलेल्या आहेत. स्वाभाविकच ही मांडणी त्या त्या काळातली आहे जी आजही सुसंगत आहे, हे सहजपणे समजून येते.

12. अर्थ तो सांगतो पुन्हा

मुक्त अर्थव्यवस्थेच्या संदर्भात केलेलं लिखाण ‘खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने’ या पुस्तकात समाविष्ट झाले होते. त्या सोबतच जवळपास प्रत्येक अर्थसंकल्पावर 1990 पासून शरद जोशी लेख लिहीत आले आहेत. या सर्व लेखांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाची सुरुवातच मुळात जनता राजवटीच्या काळात झाली होती. काँग्रेसला विरोध हा शिक्का शरद जोशींवर मारण्यात आला. तो चुकीचा असून शासकीय धोरणाला विरोध ही मूळ भूमिका होती. या पुस्तकातील लेखांतही मधू दंडवते असोत, यशवंत सिन्हा असोत यांच्या अर्थसंकल्पांवरही मनमोहन सिंग यांच्याइतकीच टीका शरद जोशी करतात. जवळपास सर्व अर्थसंकल्प शेतकरी विरोधीच आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी त्यात फारसे काही नाही. नोकरशाही नेहमीच आपले हित साधत आली आहे ही टीका फार स्पष्टपणे शरद जोशींनी केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) पहिल्या काळात लोककल्याणकारी योजना आखण्यात आल्या, ज्यामुळे फार मोठा तोटा झाला. सर्वसमावेशक विकासाच्या अर्थशास्त्राच्या मर्यादाच उघड झाल्याचं शरद जोशींनी नोंदवलेलं आहे. महागाई वाढीचा सरकारच्या धोरणाशी सरळसरळ संबंध असल्याचा आरोपही त्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अंदाजपत्रकावर केला आहे. वित्तीय तूट मर्यादेच्या बाहेर गेली असून रिझर्व्ह बँकेच्या आणि भारत सरकारच्या कुठल्याही उपाययोजनांना महागाईचा वाढता दर बिलकुल दाद देत नाहीत हेही त्यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे.
स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक क्षेत्राला प्रथम प्राधान्य, अवजड उद्योगांना अग्रक्रम आणि कमी खर्चाची अर्थव्यवस्था (लो कॉस्ट इकॉनॉमी) यावर भर देणार्‍या समाजवादी दु:साहसाच्या वाटेवर देशाला ढकलले नसते, भारताला आर्थिक झेप घेण्याचा अनुभव कितीतरी आधी घेता आला असता, अशी ठाम मांडणी शरद जोशींनी या पुस्तकातून केली आहे.

13. पोशिंद्यांची लोकशाही

शरद जोशींवर व्यक्तिश: आणि शेतकरी संघटनेवर सगळ्यांत जास्त टीका त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे करण्यात आली. खरे तर, सटाणा येथील पहिल्या अधिवेशनात अतिशय स्पष्टपणे राजकीय ठराव पारित करण्यात आला होता. निवडणुका लढवण्यापासून विविध पक्षांना पाठिंबा देण्यापर्यंत, निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यापासून ते स्वतंत्र आघाडी तयार करण्यापर्यंत सर्व पर्याय शेतकरी संघटनेने खुले ठेवले होते; पण हे समजून न घेता टीका करण्यात आली. शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका शरद जोशींनी वेळोवेळी स्पष्ट केली होती. फक्त राजकीय पक्ष म्हणूनच नव्हे, तर देशाची राजकीय परिस्थिती यावरही त्यांनी विवेचन केलेले आहे. 1990 पासूनचे त्यांचे हे विवेचन या पुस्तकात 39 लेखांमधून मांडले गेले आहे. 1994 मध्ये स्थापन केलेल्या स्वतंत्र भारत पक्षाचा सहा भागांतील जाहीरनामाही या पुस्तकात समाविष्ट आहे.  इ.स. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे विश्लेषणही त्यांनी केले होते. संपुआने चालवलेला भाई-भाई वाद देशाला विनाशाकडे नेईल, असा इशारा शरद जोशींनी दिला आहे. गेल्या अडीच वर्षांत गोंधळात सापडलेले मनमोहन सिंग यांचे नेतृत्व बघता शरद जोशींनी केलेले भाष्य किती दूरदृष्टीचे आहे हे लक्षात येते.
शेतकरी संघटनेने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पाठिंबा दिलेला होता. ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली; पण हा पाठिंबा भाजपच्या धार्मिक आणि जातीय दृष्टिकोनाला नसून त्यांनी स्वीकारलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाला होता. वाजपेयी सरकारच्या शेवटच्या काळात दिसलेला दोन आकडी विकासदर पाहता हा पाठिंबा किती योग्य होता याची प्रचिती आज येते. अर्थमंत्री म्हणून मुक्त अर्थव्यवस्था भारतात आणण्याचं श्रेय घेणारे आणि राबवणारे मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून नेमकी उलटी भूमिका घेतात हे मोठं अनाकलनीय आहे, ज्यामुळे देश परत गर्तेत अडकत चालला आहे. शरद जोशींच्या राजकीय विश्लेषणातून हे स्पष्टपणे जाणवतं, त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका ही धरसोडीची नसून एका विशिष्ट धोरणाचा पाठपुरावा करणारी होती, हे त्यांचे 20 वर्षांतले लिखाण एकत्र वाचून लक्षात येते.

14. ‘भारता’साठी

‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही मांडणी मोठ्या प्रभावीपणाने शरद जोशी यांनी अगदी 1981 सालीच केली होती. आता सगळे सर्रास हा शब्दप्रयोग करू लागले आहेत. आंदोलन आणि राजकीय भूमिका वगळता इतर सामाजिक प्रश्नांबाबत मग तो राखीव जागांचा प्रश्न असो, किल्लारीचा भूकंप असो, स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव असो, की विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत - अशा कितीतरी प्रश्नांवर सडेतोडपणे आपले मुद्दे शरद जोशी यांनी मांडले आहेत. सरकारी नोकर्‍या कमी होत आहेत. त्यामुळे राखीव जागांना फारसा अर्थ उरत नाही; पण हे समजून न घेता. राखीव जागांचे समर्थन करणारे आक्रस्ताळी भाषा बोलत राहतात. जाती-जमातींचा प्रश्न खर्‍या अर्थाने सुटावा ही इच्छा सवर्णांना तर नाहीच; पण वेगवेगळ्या जातीच्या पुढार्‍यांनाही नाही. मुळातली इंडियाची लुटालुटीची व्यवस्था कायम ठेवून त्या व्यवस्थेची जी काही शितं आहेत. त्यातील जास्तीत जास्त आपल्या हाती कशी पडतील, असा सगळेजण प्रयत्न करत आहेत. अशी वेगळी मांडणी राखीव जागांच्या प्रश्नावर शरद जोशींनी केली आहे. आणि हे स्पष्टपणे लिहिण्याचं धाडसही मंडल आयोगाच्या काळात 1990 सालीच केले आहे.
तेलंगणा, उत्तर प्रदेशचे विभाजन, वेगळा विदर्भ या विषयांवर मोठी चर्चा सध्या चालू आहे. तीव्र आंदोलनं होत आहेत. विदर्भाच्या प्रश्नावरती शरद जोशींनी फार आधीच आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना छोट्या राज्यांची कल्पना उचलून धरली होती. ‘बळीराज्य मराठवाडा’ या लेखात या छोट्या राज्यांचं शासन कसं असावं, याच्या कल्पनाही त्यांनी मांडून ठेवल्या होत्या. आज या प्रश्नावर डोकी फोडून घेणार्‍यांनी हे सगळं वाचायला हवं.
मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर ‘मुंबईकर, मुंग्या आणि मधमाश्या’ असा एक सुंदर लेख त्यांनी लिहिला. मुस्लिमांना इशारा देताना- सर्व अल्पसंख्याक समाजाची ऐतिहासिक ख्याती आहे की, त्यांना लोकशाहीच्या तंत्राने चालता येत नाही. याउलट हिंदुस्थानात मात्र मुसलमान राष्ट्राध्यक्ष, शीख पंतप्रधान आणि ख्रिश्चन काँग्रेस अध्यक्षा अशी सहिष्णुता उघडपणे नांदते. अल्पसंख्याकांचा कडवेपणा आणि बहुसंख्य समाजाची सहिष्णुता हे एकमेकांत सहज मिसळणारे नाहीत. याला उत्तर काय? याला उत्तर एकच आहे- स्वातंत्र्य आणि स्वतंत्र विचार ही एकमेव गुरुकिल्ली आहे. मुस्लिम समाजाला अशा पद्धतीने कोणीही संबोधले नाही. मुस्लिमांबाबत आणि त्यांच्या उद्योजकतेबाबत लिहिताना- ‘... एका तर्‍हेने उद्योजकतेला लागणारे गुण मुस्लिम समाजाने आपल्या अंगी बाणवले आहेत. या गुणांचा उपयोग नव्या येणार्‍या खुल्या व्यवस्थेमध्ये त्यांना आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नती करून देण्याकरिता करता येईल; पण त्याच गुणांचा उपयोग रुढीनिष्ठ समाजांना मजबुती देत देत आणि सगळ्या जगाविरुद्ध भांडण करत करत केला तर सगळ्या जगभर पसरलेल्या मुसलमानांचे आणि आजही अनेक शोषित समाजांना ज्याचे आकर्षण वाटते, त्या इस्लामचे भविष्य काही फारसे उज्ज्वल राहणार नाही.’
आपले विचार स्पष्टपणे ओघवत्या शैलीत सोप्या पद्धतीने मांडणे हे शरद जोशींचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष शेतकरी आंदोलन असो, अर्थशास्त्र असो, राखीव जागांचा प्रश्न असो, की जग बदलणार्‍या पुस्तकांविषयी केलेले विश्लेषण असो, सामान्य वाचकांना आपल्या बरोबर ते सहज घेऊन जातात. ‘अंगारमळा’मध्ये त्यांच्या लेखणीचे लालित्य उत्कटतेने प्रत्ययाला येते. स्वतंत्रतेची मांडणी करणारे त्यांचे लिखाण हा अभ्यासाचा विषय ठरावा. प्रत्यक्ष चळवळीत राहून एवढ्या मोठ्या प्रमाणात वैचारिक लिखाण करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. आपल्याकडे विचारवंतांनी प्रत्यक्ष चळवळींमध्ये सहभाग नोंदवला नाही, विचारवंत आणि चळवळीचा नेता असा दुर्मिळ योग शरद जोशींच्या या लिखाणातून पाहायला मिळतो. आपला विचार तर ते स्पष्टपणे आणि कुठेही तडजोड न करता अगदी आधीपासून मांडतच आहेत; पण त्याचसोबत अशिक्षित अशा प्रचंड मोठ्या शेतकरी समुदायाचे प्रबोधनही ते करत आहेत. त्यांची जाहीर सभांतील भाषणं असोत, की कार्यकारिणी बैठकांतील भाषणं असोत, छोटे लेख असोत, की समाजसेवेसारख्या विषयाची केलेली सविस्तर मांडणी असो सगळ्यांमधून विचारवंत, संघर्षशील जननायकाची प्रतिमा सामान्य वाचकाच्या मनात ठसते.

: पुस्तकांसाठी संपर्क :
श्रीकांत उमरीकर
संचालक - जनशक्ती वाचक चळवळ,
पिनाक, 244-समर्थनगर, औरंगाबाद-431001-31
दूरध्वनी : 0240-2341004
shri.umrikar@gmail.com
----------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया