नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



शेतकरी संघटनेला गवसलेले अनमोल रत्न ऍड वामनराव चटप

शेतकरी संघटनेला गवसलेले अनमोल रत्न ऍड वामनराव चटप
 
             स्पष्ट विचार, निर्भिड मांडणी, धडाडीचे कर्तुत्व, सचोटी, प्रामाणिकपणा, अभ्यासू, जिज्ञासु व कर्तव्याप्रती समर्पित भाव अशी आणि अशा तऱ्हेची सर्व गूणविशेषणे ज्याला तंतोतंत लागू पडतात आणि ज्यांच्या कर्तुत्वाचा आलेख मांडायला शब्दही अपुरे पडतात अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ऍड वामनराव चटप.
 
             एकाच शेतकरी संघटनेत काम करताना चाळीस वर्षाचा त्यांच्यासोबतचा माझा सहवास सुद्धा विलक्षण म्हणावा असा राहिला आहे. काळानुरूप आमच्यातील नात्याचे स्वरूपही बदलत गेलेत. सुरुवातीच्या काळात एक सहकारी कार्यकर्ता-पाईक-मित्र म्हणून, मधल्या काळात माझे नेते म्हणून तर आता एक मार्गदर्शक म्हणून या व्यक्तिमत्त्वाचे माझ्या आयुष्यात स्थान अधोरेखित झाले आहे.
 
             शेतकरी संघटना आणि युगात्मा शरद जोशी यांच्यावर नैसर्गिक अढळ निष्ठा हा त्यांच्या उपजत स्वभावाचा एक स्थायी पैलू राहिल्याने ४० वर्षाच्या प्रवासात अनेक चढउतार येऊनही त्यांचे शेतकरी संघटनेतील आदरपूर्ण स्थान धृवाइतकेच अढळ राहिले आहे. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. शेतकरी संघटनेला भगदाडं पडत असतांनाही "गेले ते कावळे, राहिले ते मावळे" म्हणत शेतकरी संघटनेची पताका फडकत ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
 
             शेतकरी संघटनेच्या आधाराने अनेक लोकांना राजकारणात संधी मिळाली. काहींना आमदार म्हणून विधानसभेत तर काहींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक प्रतिष्ठेच्या पदापर्यंत पोचता आले पण राजकीय मान-मरातब मिळाल्यानंतर अनेकांना सीतेच्या शोधाचे प्रयत्न सोडून रावणाच्या लंकेत लाभार्थी बनून तिथेच रममाण होण्याचे स्वप्न पडलीत. त्यामुळे ते शरद जोशी आणि शेतकरी संघटनेकडे पाठ फिरवते झाले. शेतकरी संघटनेने आजवर अनेकांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवले पण त्यापैकी सरोजताई काशीकर व ऍड वामनराव चटप हेच दोन व्यक्तिमत्व शेतकरी संघटनेसोबत आजतागायत अत्यंत प्रामाणिक राहिलेले आहेत.
 
             तसे त्यांचे राजकारणात येणे आणि आमदार होणे हा सुद्धा योगायोगच आहे. विधी शाखेची पदवी घेऊन 1976 ते 1980 या काळात वकिली व्यवसाय करत असताना ते  शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळीकडे आकर्षित झाले आणि शरद जोशींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शेतकरी संघटनेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून दिले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी मागे फिरून पाहिलेच नाही. त्यांची कामाची शैली आणि कठोर परिश्रम बघता हा मनुष्य आहे की यंत्रमानव असा आम्हाला अनेकदा प्रश्न पडतो. याच कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी अगदी प्रारंभीच्या काळातच शेतकरी संघटनेत स्वतःचे स्थान निर्माण केले. 
 
             सत्तेचे संतुलन साधण्यासाठी तसेच वाढता जातीयवादाचा भस्मासुर रोखण्यासाठी दुबळ्या विरोधी पक्षाला भरीव सहकार्य करण्याची निवडणूक भूमिका शेतकरी संघटनेने घेतली. अनायासे राजुरा मतदारसंघात विरोधी पक्षांकडे सक्षम उमेदवार नसल्याने ऍड वामनराव चटप यांनी उमेदवारी करावी, असा एक प्रस्ताव समोर आला आणि शेतकरी संघटनेच्या आग्रहाखातर त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा.
 
             राजकारणी नसूनही राजकारणातच असणे, त्यासोबतच निष्कलंक, निष्कपट, सरळमार्गी, सभ्य व सज्जन व्यक्तिमत्व असलेल्या ऍड. चटप यांना मतदारांनी तीनदा विधानसभेवर पाठवले. विधानसभेत अन्य आमदारांचे पाठबळ नसताना सुद्धा त्यांनी २-३ सदस्य सहकाऱ्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या बाजूने एकाकी किल्ला लढवत मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यांना दोनदा उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरव प्राप्त झाला. आजच्या जगात आणि युगात लोकशाहीला लाभलेले दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणून ऍड. चटप यांचेकडे पहिले जाते.
 
             खुद्द युगात्मा शरद जोशी तर म्हणायचे की वामनराव शेतकरी संघटनेत आहेत म्हणजे वामनराव यांचेवर शेतकरी संघटनेचे ऊपकार नसून शेतकरी संघटनेला वामनराव मिळाले हे वामनरावांचे शेतकरी संघटनेवर उपकार आहेत. शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदापासून तर स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत सर्व सर्वोच्च पदे त्यांनी समर्थपणे सांभाळली. आंतरराज्य किसान समन्वय समितीमध्ये सुद्धा त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे, आयुष्याच्या अंतिम चरणात शेतकरी संघटनेची धुरा सांभाळण्यासाठी युगात्मा शरद जोशींनी निवडक लोकांना घेऊन शेतकरी संघटना ट्रस्ट स्थापन केला, त्यातही ऍड. चटप यांच्या खांद्यावर तोलामोलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 
             अशा या सद्गुणी, कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्वाला विधानसभेतील त्यांचे प्रभावी कार्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेला सातत्यपूर्ण लढा, जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू असलेली धडपड व त्यांचा सेवाभाव या सर्व कार्यांची दखल घेत दिल्ली येथील इंडिया इंटरनँशनल फ्रेन्डशिप सोसायटीने त्यांची भारत ज्योती अँवार्डसाठी निवड केली. दि. ९ एप्रिल रोजी माजी स्थलसेना उपाध्यक्ष सरदार जगजीतसींग, चेन्नईच्या राज्यसभा खासदार शशिकलापुष्पा रामास्वामी व राष्ट्रीय लोकदलांचे जनरल सेक्रेटरी श्री त्यागी यांच्या हस्ते भारत ज्योती अँवार्ड व उत्कृष्ट कामगिरी चे प्रमाणपत्र इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे हा बहुमोल पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष उल्लेखनिय म्हणजे हा पुरस्कार मिळविणारे ऍड. चटप हे महाराष्ट्रातील तिसरे व्यक्ती आहेत. यापुर्वी क्रिकेटर सुनिल गावस्कर व शिक्षण महर्षी तथा बिहारचे राज्यपाल डि. वाय. पाटील यांना हा बहुमान मिळालेला आहे.
 
             माणसाचे सरासरी आयुष्य ६५ वर्षे असल्याने त्यानंतरचा जीवनकाळ केवळ बोनस आयुष्य असल्याने त्यातील एक एक क्षण सत्कार्यी खर्च व्हावा, असे ते स्वतः मानतात. अशा या अतुलनीय व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्याचा सदिच्छेसह मानाचा मुजरा!
 
गंगाधर मुटे
प्रदेशाध्यक्ष
माहिती व तंत्रज्ञान आघाडी
शेतकरी संघटना, महाराष्ट्र
==========
आजवर अडगळीत पडून राहिलेले छायाचित्र : १९८५ मध्ये शेतकरी संघटनेच्या प्रचारासाठी भटकत असताना गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे वैनगंगेवर स्नान. डावीकडून सर्वश्री स्व. जीवन टिळक, ऍड. वामनराव चटप, श्री रवीभाऊ काशीकर, स्व. सुरेश चोपडे, गंगाधर मुटे आणि श्री. मोरेश्वर टेमुर्डे (माजी विधानसभा उपाध्यक्ष)

वामनराव चटप

 
शब्दखुणा-Tags: