नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



अभिनंदन सोहळा : वर्धा

VDO
सत्कार समारंभ : वर्धा
 
              आपल्याच मुखाने आपलेच गुणगाण गात ही बातमी तुमच्याशी शेअर करायचा विचार नव्हता. पण  या "सत्कार समारंभाच्या" बातम्या वृत्तपत्रात झळकायला लागल्या नंतर मित्रमंडळीकडून फ़ोनवर/ईमेलच्या माध्यमातून विचारणा व्हायला लागली आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे सांगणे जड जायला लागले, शिवाय मनातील काही भावना सुद्धा व्यक्त करण्याशिवाय राहावले नाही म्हणून उशिराने का होईना पण ही आगळीक.
              माझ्या ब्लॉगला स्टार माझा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर फ़ारच मोठी उपलब्धी आणि तेवढीच डोकेदुखी ठरेल असे दिसते. पुरस्कारामुळे आपले कर्तृत्व इतरांच्या नजरेत भरून ते व्यापकप्रमाणावर अधोरेखीत होत असते. अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची मुसळधार बरसात ही होत असतेच. पण माझ्या बाबतीत हा पुरस्कार मला जरा जास्तच भरभरून देत आहे. गरजेपेक्षा जास्त म्हणा की छप्परफ़ाडून देणे म्हणा असंच काहीसं माझ्या बाबतीत होत आहे. 
              सर्वप्रथम मी मायबोलीकर असल्याने मायबोलीवर आणि मी मराठीकर असल्याने मी मराठीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पुरस्काराच्या यादीत ३-४ वैदर्भीय नावे आहेत पण मी विदर्भातील एकमेव रहिवासी वैदर्भीय असल्याने स्थानीय सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी  वृत्तपत्रात ही बातमी अगदी फ़ोटोसहीत झळकली.   इथपर्यंत ठीक होतं पण एकदम सत्कार समारंभ?
              होय हे खरे आहे. दिनांक १४ डिसेंबरला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग,  स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, शैलजाताई देशपांडे, सुमनताई अग्रवाल, मराठवाडा विभाग प्रमुख श्री कैलास तंवार, विदर्भविभागप्रमुख श्री जगदिशनाना बोंडे,  श्री पांडुरंग भालशंकर, नागपूर जिल्हाध्यक्ष श्री अरूण केदार, अमरावती जिल्हाध्यक्ष श्री विजय विल्हेकर, मधुसुदन हरणे, प्रा. मधुकरराव झोटींग, डॉ. इसनकर, श्री. निळकंठ घवघवे यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
*    *    *   *   *   *   *

 
*    *    *   *   *   *   *
 
*    *    *   *   *   *   *
              मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, वाचत नाही आणि लिहितही नाही. त्याच अर्थाने शेतकर्‍यांची  संघटनाही निरक्षर असते. त्यांच्या कार्याची दखल "बेदखल" असते. लाखो शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला किंवा शांततामय मार्गाने धरणे दिले तरी प्रसार माध्यमात ती न्यूज बनत नाही, किंवा बनली तरी एखाद्या कोपर्‍यात आगपेटीच्या आकारात तिला स्थान मिळत असते. याउलट राजकीय व्यक्ती शिंकली किंवा एखाद्या सेलेब्रिटीच्या पोटात गर्भ वाढत असेल तर भारतीय प्रसार माध्यमांसाठी ती ब्रेकिंग न्यूज ठरत असते, वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने खर्ची पडायला लागतात.
              त्या पार्श्वभूमीवर स्टार माझाला दखल घेण्याइतपत मी आंतरजालावर शेतकरी विषयक लेखन केलं, हे सर्वांना फ़ारच सुखावून गेलं असावं. नागपुरच्या भेटीत चटप साहेबांनी माझ्या सत्काराचा विषय काढला तेव्हा मी त्यांना म्हटले की, असं काही करू नये, शक्यतोवर टाळावे. तर ते म्हणाले “आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही तर कुणी करावे.” वर्ध्याच्या मिटींगमध्ये सरोजताई म्हणाल्या. आम्ही सत्कार नाही तर “कौतुक सोहळा” करू. सत्कार काय किंवा कौतुक काय, शब्दामधले फ़रक. त्यामागची भावना आणि प्रेरणा मात्र एकच. सत्कार किंवा कौतुक करू नये असे नाही, पण या निमित्ताने माझ्या समोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न असा की सत्कार कुणी कुणाचा करायचा. आज माझ्या कवितांचे बर्‍यापैकी कौतुक होत आहे. माझ्या लेखनीला पुरस्कार मिळत आहे, मी प्रगल्भ आणि दर्जेदार लेखन करतो हे जवळपास सर्वमान्य होत आहे.
              मग हे जर खरे असेल तर, एवढे चांगले लिहिण्याची शक्ती माझ्याकडे आली कुठून? मी वयाच्या विसाव्या वर्षी शेतकरी संघटनेत आलोय. मला माहित आहे की, मी शेतकरी संघटनेत येण्यापुर्वी एक दगड होतो. मी जे काही शिकलो ते शेतकरी संघटनेकडून शिकलो. मी जर आज प्रभावी आणि दर्जेदार काव्य लिहू शकत असेल तर ती बुद्धी मला फ़क्त आणि फ़क्त शेतकरी संघटनेने दिली आहे. शरद जोशींचे ,शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे विचार दर्जेदार होते म्हणून माझ्या लेखनीतले विचार दर्जेदार असावे, हे निर्विवाद सत्य आहे.
              मग सत्कार कुणी कुणाचा करायचा? मी शेतकरी संघटनेचे आभार मानायचे की शेतकरी संघटनेने माझा सत्कार करायचा?
दुसरा प्रश्न. आम्ही चळवळीतली माणसं, आंदोलन आमचा पिंड. आजही मला मी कवी आहे याचा जेवढा अभिमान वाटत नाही त्यापेक्षा मी शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक आणि एक आंदोलक आहे, याचा जास्त अभिमान वाटतो. आणि आंदोलकांनी जे काही करायचे ते स्वत:साठी नव्हे तर चळवळीसाठी करायचे असते. जगायचे तर चळवळीसाठी, मरायचे तर चळवळीसाठी हाच आंदोलकांचा धर्म असला पाहिजे. त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्‍यांनी शक्यतो सत्कारापासून वगैरे चार हात लांबच असले पाहिजे हे माझे मत.
              तिसरा प्रश्न. या तिसर्‍याप्रश्नामागे इतिहास आहे. शेतकरी संघटनेचा इतिहास असे सांगतो की, मुळातच दगड असलेल्यांना शेतकरी संघटनेने शेंदूर लावून मोठे बनविले. दगदाचा देव बनवला. पण मुळातच दगड असलेले दगड मोठेपण प्राप्त झाल्यावर स्वत:ला शेतकरी संघटना आणि शरद जोशींपेक्षाही मोठे तत्वज्ञानी,राजकारणी समजायला लागले, आणि ज्या संघटनेने त्यांना मोठे बनविले त्या संघटनेशी दगाबाजी करून उठून पळालेत. १९८० ते २०१० या काळातील संघटनेला सोडून गेलेल्यांची  यादी बनविली तर ही बाब निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे यापुढे तरी संघटनेने सावधगिरीने पावले टाकली पाहिजेत असे मला वाटते.
              मला सध्या एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे. याबाबत मी माझ्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहातील लिहिलेल्या भुमिकेत सविस्तर उहापोह केला आहे.
              शेतकरी संघटनेच्या एवढ्या वर्षाच्या प्रवासात एक मुद्दा नेहमीच चर्चीला गेला की, शेतकरी चळवळीला पुरक असं साहित्य का तयार होत नाही. शेतकरी समाजाचं वास्तववादी साहित्य तयार व्हायलाच पाहिजे. हाच प्रश्न बराच काळ सतावत होता आणि आजही सतावतो आहे कारण आपण म्हणतो की वास्तववादी साहित्य तयार व्हायला पाहिजे, पण आम्ही मात्र लिहिणार नाही,मग ते कुणी लिहायचं? तर इतरांनी लिहायचं. मला कायम प्रश्न पडतोय तो असा की आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे भोगलंय, आमची अनुभूती, आमचा विचार पण तो आम्ही नाही लिहिणार, तो इतरांनी लिहावा. हे कसे शक्य आहे? हे शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मीती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढा प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत.
              आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. बस्स. ह्या एकाच प्रेरणेपोटी मी हाती लेखनी धरली. आणि कविता  लिहायला लागलो.
              यानिमित्ताने आपण माझे कौतुक केले, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणुन मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
        
   - गंगाधर मुटे
*    *    *   *   *   *   *
 
अभिनंदनपर मनोगत व्यक्त करताना शैलजाताई देशपांडे
*    *    *   *   *   *   *
 
 
अभिनंदनपर मनोगत व्यक्त करताना माजी आमदार सरोजताई काशीकर
*    *    *   *   *   *   *
 
*    *    *   *   *   *   *
 
                   शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग म्हणाले की, गंगाधर मुटेंच्या एका कवितेत गावातला एक शाम्या नावाचा मुलगा बिपाशासाठी मुंबईला लुगडं घेऊन जातो आणि त्या शाम्यात गावरानपणा ठासून भरला आहे. श्याम्यानं तर कहरच केला. इच्चीबैन. आता इच्चीबैन या शब्दात असं काय आहे की ते प्रत्येकाला हसायला लावतं? तर गंगाधर मुटेंच्या शब्दातली ही जादू आहे. या कवितेची ओरिजिनीलीटी काय तर अस्सल गावरानपणा. गंगाधर मुटेंच्या कवितामधून  त्यांची अनुभूती अभिव्यक्त झाली आहे. त्यांच्या कवितेचा आवाका मोठा आहे. त्यांनी गझल लिहिली, त्यांनी लावणीपण लिहिली. एक लावणी तर इतकी सुंदर आहे की ती शेतकर्‍याची मुलगी म्हणते की “मला पावसात भिजू द्या.” तिला आता पावसात खेळायचे आहे. तिच्या मैत्रीनी म्हणतात की तिला मनसोक्त नाचू द्या. तिला स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या. तिच्या आनंद घेण्याच्या कक्षा तिला रुंदावू द्या. अडथळे आणू नका. असे ती लावणी सांगते. गंगाधर मुटेंच्या कवितेमध्ये ती सगळी विविधता भरली आहे. त्यांनी असं म्हटलंय की माझ्या आयुष्यात भाकरीचा शोध घेता घेता अर्ध आयुष्य निघून गेले आणि तारुण्यपणात पाहिलेले स्वप्न भाकरीच्या शोधातच उध्वस्त झाले. सुरुवातीला “बरं झाले देवाबाप्पा शरद जोशी भेटले” असे लिहिणार्‍या कवीची मध्यंतरीच्या काळात जणूकाही कविताच करपून गेली होती. मध्ये बराच मोठा अंतराळ गेला, पुन्हा त्यांची कविता बहरून आली आणि ते संघटनेचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांच्या कवितेचं स्टारमाझाने कौतुक केलं आणि त्या निमित्ताने आपण आपल्या परिवारातल्या कार्यकर्‍याचं कौतुक करीत आहो. मा. शरद जोशींनी ज्या दिवशी गंगाधर मुटेंच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली, मला असं वाटतं की यापेक्षा मोठं कौतुक या कवीचं दुसरं कोणतंच असू शकत नाही. आपण पुन्हा एकदा या कवीचं टाळ्या वाजवून जोरदार कौतुक करुया.
*    *    *   *   *   *   *
 
 *    *    *   *   *   *   *
                    सभेत बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप म्हणाले की, एकमेकाच्या सुखदु:खात वाटेकरी व्हावे हा माणसाचा स्वभाव आहे आणि शेतकरी संघटनेचं आपलं हे संयुक्त कुटूंब आहे. आपल्या संयुक्त कुटूंबातल्या एका भावाने एका वेगळ्या क्षेत्रात, संघटनेचं कार्य करता करता, त्याच्या मनातल्या असणार्‍या भावना, मनातल्या कल्पना, त्याच्या मनातल्या भुमिका, शेतकरी संघटनेचं काम हे गद्यातलं असलं तरी पद्यामध्ये मांडून समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे, म्हणून, संघटना ही आपली आई आहे, आणि आईचं काम आहे की लेकराचं कौतुक करावं. म्हणून साहेब स्वत: आज गंगाधरच्या या सत्कार समारंभाला हजर आहेत. ज्याची दखल स्टार टीव्हीच्या चॅनेलने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं त्या तर्‍हेचं कौतुक होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या कुटूंबातल्या माणसाला अवार्ड, पुरस्कार मिळतो तेव्हा आपल्या कुटूंबाचा घटक म्हणून त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं आवश्यक असते. म्हणून आपण हा कौतुक सोहळा साजरा करीत आहोत.
*    *    *   *   *   *   *
 
*    *    *   *   *   *   *
 सभेला मार्गदर्शन करताना शरद जोशीं म्हणाले की,
 
        बैठक तशी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेची, पण गंगाधर मुट्यांचा कौतुकाचा समारंभ आहे, असं म्हटल्यानंतर उत्तर विदर्भातल्या आणखी दोन-चार जिल्ह्यातली मंडळी आली, अमरावतीची मंडळी इथं आलेली दिसतात, अशा वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे.
         वर्धा जिल्ह्याची बैठक आणि त्या बैठकीला मी उपस्थित, हा काही फारसा नवा प्रकार नाही. वर्धा सोडल्यास इतर अनेक जिल्ह्यातल्या लोकांची तक्रार अशी आहे की, त्यांच्या जिल्ह्यातल्या एकाही बैठकीला मी अद्याप हजर राहिलेलो नाही. योगायोगाचा भाग असा, वर्ध्याचं भौगोलिक स्थान असं की विदर्भामध्ये कुठंही जाताना मध्ये वर्धा लागतं आणि वर्धा लागल्यानंतर इथे वहिनी आणि रविभाऊ यांना भेटल्याखेरीज पुढे जाणं मला शक्य होत नाही, मग मुक्काम झाल्यानंतर साहजिकच काहीतरी तुमची बैठक असतेच आणि त्या बैठकीला माझं येणं होतं. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातल्या किती बैठकींना मी हजर होतो, याचा हिशेब काढला तर माझ्या कल्पनेप्रमाणे दोन डझनाच्या वर बैठकींना मी स्वतः हजर होतो, हे इतरत्र कधी घडलेलं नाही.
         प्रसंग असा, वामनराव चटप आणि वाहिनीने मला आंबेठानला सांगितलं की, चंद्रपुरला एक कार्यक्रम आहे, आणखी त्याच्यानंतर गंगाधर मुटेचाही हा कौतुक सोहळा आहे. माझ्या मनामध्ये जो कार्यक्रम होता तो थोडा वेगळा होता. रावेरीला लोकर्पण सोहळा झाला, त्या सोहळ्याला मी हजर राहिलो नव्हतो. आणि फार लोकांची निराशा झाली, मी तिथे आलो नाही, कारण सीतामंदिराची कल्पना माझी, त्याकरिता जो निधी उभा करण्यात आला त्याच्या मध्ये माझा व्यक्तिशः जवळजवळ सगळ्यात मोठा, सिंहाचा वाटा आहे. लोकांना मी नसल्यामुळे जितकं वाईट वाटलं, त्याच्यापेक्षा मी तिथे हजर राहू शकलो नाही याचं वाईट वाटलं. आणि मिळेल ती पहिली संधी साधून, ते सीतामंदीर आता साकार झालेलं, कळस चढलेला डोळ्याने पाहावा ही माझी इच्छा होती. जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे कळस अपुरा होता. आता तो पुरा झाला आहे. आणि तो झाल्याचे कळताच उद्या रावेरीला त्या मंदिराचं दर्शन घेऊन सीतामाईच्या मूर्तीपुढे दंडवत घालण्याकरिता जाणार आहे. मुख्य कार्यक्रम तो. मग त्याला जुळून गंगाधर मुटेच्या कौतुकाचा कार्यक्रम आणखी चंद्रपूर मधल्या एका शेतकर्‍याने एचएमटी भाताची जात शोधून काढल्याबद्दल त्याला पुरस्कार कार्यक्रम आहे.
 
          शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरिता त्यांच्या कौतुकाची काही बैठक झाली, समारंभ झाले असे कधी झाले नाही. कौतुक करावे असे प्रसंग घडले नाहीत असे नाही, मानवेंद्र काचोळे आंबेडकर विद्यापीठाचे रजिस्ट्रार झाले, आपण त्यांच्या कौतुकाची सभा नाही घेतली. मोहन गुंजाळ यांना सामाजिक कार्याबद्दल एका मान्यवर संस्थेने पुरस्कार दिला. आपण त्यांचं कौतुक नाही केलं. अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या तर्‍हेच्या कामगिरीकरिता किंवा कौतुकाकरिता हा सत्कार समारंभ आहे. आणि माझ्या मनात ही शंका होतीच की बहुतेक जमलेल्या लोकांना हा सत्कार कशाकरिता आहे हे काही फारसं कळलेलं नाही. शेगावला मी स्वतः मुट्यांच्या कवितेच्या पुस्तकाचं प्रकाशन केल्यामुळे मुट्यांचं कवितेचं पुस्तक आहे, पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आणि त्याला प्रस्तावना शरद जोशींनी लिहिली आहे, इतकं लोकांच्या कानावरती उडतउडत गेलं होतं. रवी देवांग म्हणाल्याप्रमाणे संघटनेचा कार्यकर्ता काही वाचणारा नाही. ही तशी निरक्षर लोकांची संघटना आहे. जेव्हा जुन्या काळी शेतकरी संघटक निघायचा त्याला पिन असायची, ती पिनही न काढताच “आमच्याघरी फ़ारपुर्वीपासून शेतकरी संघटक आहे” असे सांगायची. तो उघडायचा नाही, वाचायचा नाही, त्यात एखादा चांगला लेख आला तर त्याच्याबद्दल पत्र वगैरे टाकून कळवलं आहे, असं कधी झालं नाही. पण आमच्याकडे पहिल्यापासूनचे सगळेच अंक आहे असं सांगायची.
 
           गंगाधर मुट्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्याकरिता प्रस्तावना लिहिल्यानंतर आणि मी तेथे हजर राहणार आहे म्हटल्यावरती साहजिकच थोडं कुतूहल नेहमीपेक्षा जास्त वाटलं. आणि गंगाधर मुटे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तेव्हा जिल्हाध्यक्षाच पुस्तक आणि ते पुस्तक कॉम्प्युटरवर, नेटवर्कवर केलं आहे, म्हणजे नेमकं काय, याची फारशी कल्पना नाही, पण कौतुकाचा समारंभ ठरला आहे म्हणजे काहीतरी त्यात विशेष आहे, असा कार्यकर्त्यांचा समज असावा. माझी या प्रसंगात थोडीशी अडचण होते ती अशी की मी मुळामध्ये काव्यबुद्धीचा नाही. काव्यप्रतिभा ही माझ्याकडे शून्य आहे. पुण्याला राष्ट्रसेवादलाच्या एका बैठकीमध्ये ना.ग.गोरे यांना त्यांच्या बैठकीमध्ये कुणीतरी एक प्रश्न विचारला की शेतकरी संघटनेचं आंदोलन फार मोठं होतं, लाखाच्या संख्येने लोक येतात, लाखाच्या संख्येनं तुरुंगात जातात, शिक्षा भोगतात, त्यांच्या संबंध आंदोलनामध्ये, मघाशी गंगाधरने म्हटल्याप्रमाणे, साहित्यनिर्मिती फारशी नाही. आणि साहित्याकरिता केवळ गद्यलिखान, लेख आणि पुस्तके लिहून भागत नाही. ना.ग.गोर्‍यांनी असं म्हटलं की याचं कारण असं आहे की शरद जोशी हा मनुष्यच मुळात गद्य स्वभावाचा आहे. त्याला काव्यशक्ती नसल्यामुळे त्याची मांडणी सगळी गद्य स्वरूपाची आहे. आणि शेतकरी किंवा कोणतेही आंदोलन चालवायचं म्हणजे इतकं तर्कशुद्ध, तर्ककर्कश असून भागत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडा पागलपणा यावा लागतो. आणि पागलपणा आल्याशिवाय लोकं आहुती चाखायला तयार होत नाही.
 
            मी प्रामाणिकपणे सांगतो की, कुणाची सेवा करायची,कुणाची करुणा करायची या भावनेने मी कामाला लागलो नाही. अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशेब करून मी या कामाला लागलो. मी संयुक्त राष्ट्रसंघात राहिलो असतो तर भारताची राजकीय प्रतिष्ठा लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव,सेक्रेटरी जनरल त्याच्या खालोखाल डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदापर्यंत पोचलो असतो. पण मी जेव्हा मनाशी हिशेब केला की हिंदुस्थानातल्या दारिद्र्यनिर्मुलनाचे काम इतकं महत्त्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट,पराजय,अपमान सोसावे लागले तरी सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचीव होण्यापेक्षा या कामामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने, गणिताने मी या कामात पडलेलो आहे. माझ्यामध्ये काव्यशक्ती नाही हा मुद्दा मी वारंवार मांडलेला आहे.
 
            आणखी एक गंमत आहे. मी या कामाला लागल्यापासून अनेक कवींनी माझ्यावरती त्यांच्या कवितासंग्रहाचा भडिमार केलेला आहे. मोठमोठ्या चळवळींना शाहीर लागतात त्याशिवाय ती चळवळ मोठी होत नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर अमरशेख, अण्णाभाऊ साठे नसते, तर  संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधीही यशस्वी झाली नसती, हे मी माझ्या “विनाशाचा इतिहास” या लेखात मांडले आहे. शाहिरांची फार मोठी परंपरा आहे. पण माझ्याकडे ज्या कवितांची पुस्तके आली त्याच्यामध्ये साधारणपणे मंचावरती उभं राहून म्हणता येतील, आणि म्हटली तर लोकांना आवडतील, अशा तर्‍हेच्या कविता करताना, सध्या जी काही सिनेमाची लोकप्रिय गीतं आहेत, उदाहरणार्थ दादा कोंडक्यांचं “ढगाला लागली कळं” या चालीवरती जर ”शेतीमालाला हवा भाव” अशी कविता लिहिली, तर मला ते हातात धरवत नाही. या बाबतीत मी फार कडक मनुष्य आहे. माझी काव्यशक्ती या बाबतीत फार मर्यादित आहे. पण मी प्राचीन-अर्वाचीन कवींचा फार भक्त आहे. मोरोपंत आणि वामन हे माझे आवडते कवी आहेत. आणि यांना मी कवी मानतो, पण “शेतकरी संघटना- विचार आणि कार्यपद्धती” हे पुस्तक घेतलं  आणि त्याच्या ओळी तोडून एकाखाली एक मांडून त्याला मुक्तछंदाच्या नावाखाली काव्य म्हणणं, मी ते सहन करायला तयार नाही. माझ्या कवितेच्या बाबतीत ज्या काही परीक्षा आहेत, त्या तशा कडक आहेत. मला स्वतःला कविता करता येत नाही, हे मी मान्य करतो. पण कविता करताना दोन गोष्टींचे आदर्श माझ्यापुढे आहेत. पहिली गोष्ट. वाल्या कोळी त्याच्या आधीच्या जीवनाचा पश्चात्ताप झाल्यानंतर एका पहाटे दृश्य पाहिलं आणि त्याच्या तोंडून जे पहिल्यांदा काव्य सुटलं ते संबंध रामायणाच्या रूपाने बाहेर पडलं. ही काव्यशक्ती जागृत झाल्याची काहीएक लक्षणं आहेत. किंवा पु.ल.देशपांडेनी माडगूळकराविषयी असं लिहिलंय की, माडगूळकरांनी आज्ञा दिली की सगळे शब्द यमक, अनुप्रास जुळवून रांगेत उभे राहतात. हे आपोआप त्यांच्यावरती कशी काय जादू-चमत्कार होते ते सांगता येत नाही. आणि असं जर का तोंडातनं न निघता, ज्याला शब्द ठोकून, मग याला यमक जुळतं का, अनुप्रास जुळतो का असं बघून कविता केली असली ना, की त्याचा वास मला फार पटकन येतो.
 
      मी शक्यतो कोणत्याही कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीत नाही. गंगाधर मुट्यांच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, त्याचा त्यांना आनंद वाटत असेल तर तो त्यांनी व्दिगुणित करून घ्यावा. कारण मी पूर्वी कधी प्रस्तावना लिहिलेली नाही. आणि आणखी एक सांगतो की, सध्या महाराष्ट्राचे एक गाजलेले कवी, जे कवी संमेलनाचे अध्यक्षही झालेले आहे, त्यांनी असाच शेतकर्‍यावरती लिहिलेला काव्यसंग्रह माझ्याकडे आणला तेव्हा त्यांना मी असं म्हटलं, मला असं वाटतं की हे कवितेचं पुस्तक तुम्ही पुन्हा एकदा लिहा. “वार अ‍ॅंड पीस” हे पुस्तक स्टॉलस्टॉयने जेव्हा लिहिलं ना, तेव्हा सबंध पुस्तक, आधीच त्या पुस्तकाची जाडी फार प्रसिद्ध आहे. एवढ्या जाडीचं, इतक्या पानांचं पुस्तक, स्टॉलस्टॉयने एकदा लिहून छापायला नाही दिलं, पुन्हा-पुन्हा लिहून, जेव्हा मनामध्ये भगवदगीते मध्ये ‘ब्राह्मी’ स्थितीचे वर्णन केले आहे ती ब्राह्मीस्थिती मनात निर्माण होते तेव्हा तुमचे प्रॉडक्ट तयार झालं, तो पर्यंत नाही. तेलामध्ये भजी टाकल्यानंतर भजी तयार झाली की नाही, हे जसे रंगावरून समजते, तसं तुमच्या मनामध्ये ब्राह्मीस्थिती तयार झाली की लिहायचं, तोपर्यंत नाही. म्हणून मी असं म्हटलं की तुम्ही आणखी एकदा लिहावं.
 
      ज्यांचा जमिनीवरती पाय आहे अशा अमरशेख सारख्या कवीचा कार्यक्रम, मग तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या किंवा कम्युनिष्ट पक्षाच्या संबंधात असो, कम्युनिष्टांचं तत्त्वज्ञान मला कधीच पसंत पडलेलं नाही पण, अमरशेख मंचावरती उभा राहिला आणि “ही आग भुकेची जळते आमुच्या पोटी” म्हटल्यावर माझ्या अंगावर शहारा येतो. अशा तर्‍हेची शाहिरी ज्यांनी गाजविल्या, त्यांनी त्यांच्या चळवळी पुढे नेल्या. शेतकरी संघटनेची चळवळ याबाबतीत दुर्दैवी राहिली हे खरे आहे.
 
            पण तरी या निमित्ताने एक गोष्ट बरी झाली. रवी देवांगानी भाषण सुरुवात करताना, मला साहित्य, संस्कृती विषयातलं काही कळत नाही म्हणून नंतर आपलं साहित्यातलं ज्ञान चांगल्यापैकी दाखवलं. आणि वामनराव चटप यांनीही आजपर्यंत फार कधी काव्य दाखवलं नाही, त्यांनीही आज एकापाठोपाठ इतक्या कवींची आठवण काढली की, त्यांना मी भाषणाऐवजी कविता म्हणायला उत्तेजन दिलं असतं तर कदाचित शेतकरी आंदोलनाचं जास्त भलं झालं असतं, असं मला आज वाटायला लागलं.
              मुख्य विषय असा की, हा पुरस्कार किंवा कौतुक त्या कवितेच्या पुस्तकाबद्दल नाही आणि कवितांचं रसग्रहण करणे हा माझा अधिकार नाही. याउलट ज्या क्षेत्रामध्ये मुट्यांना पुरस्कार मिळाला आहे, ते क्षेत्र माझं आहे, हे लक्षात घ्या. मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गणकयंत्र विभागाचा प्रमुख होतो. मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथे माहीत नव्हतं. राजीव गांधींनी ते नंतर आणलं. आणि त्यावेळी माझ्याकडे पहिल्यांदा आयको-२ मॉडेल आलं, त्याचा उपयोग करून मी शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, याचं एक सॉफ्टवेअर तयार केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये मी तुम्ही दररोज जे काही कामे करता त्यापैकी कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे, कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे नाहीत, याचं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं होतं. पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा आणि त्यानंतर आपली चूक झाली आणि अजूनही शेतकरी संघटनेचं संकेतस्थळ अजूनही पूर्णं झालेलं नाही. सुरुवात झाली पण त्याला नियमितपणे अपडेटींग करणे शेतकरी संघटनेला फारसं जमलेलं नाही. याउलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी उदा. NGO ज्यामध्ये मेघा पाटकर, वंदना शिवा किंवा सुमन नारायण, यांच्या चळवळींना जनाधार जवळजवळ शून्य असताना, केवळ त्यांनी गणकयंत्राच्या हिशेबाने आपण फार मोठी संघटना आहे, हे दाखवलं. केवळ महसूलखात्याकडून किती शेतकर्‍यांनी आत्महत्यां केली, त्यांची नांवे, परिस्थिती यांची आकडेवारी घेऊन संकेतस्थळं तयार केली आणि मोठीमोठी पारितोषकं मिळवून गेली. आम्ही याबाबतीत फार कमी पडलो. अलीकडे या बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे. म्हात्रे सरांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ई-मेलने पाठवायला सुरुवात केली आहे. आणि अलीकडे या ब्लॉगमध्ये मी निदान दोन नावं घेतो. सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करताहेत. आज ना उद्या त्यांच्या कामालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मी आशा करतो. सुधाकर जाधव हा शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीचा जुना कार्यकर्ता. मुळातच छात्र युवा संघर्ष वाहिनीचा. शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अनेकदा मी स्वतः सुधाकर जाधवला बोलायचा आग्रह केला. तो बोलला म्हणजे काहीतरी नवीन,विशेष बोलणार अशी माझी अपेक्षा असते. आणि त्याप्रमाणे तोही त्याचा ब्लॉग चांगल्या तर्‍हेने चालवतो, अमर हबीबही चांगला चालवतोय. गंगाधर मुट्यांप्रमाणे ही मंडळीही या क्षेत्रात पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी, कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत होईल अशी मी आशा करायला हरकत नाही.
 
    शरद जोशी  
(शरद जोशींचे वर्धा येथील भाषण. शब्दांकन – प्रविण पोहाणे)
*   *   *   *   *   *   *
 
दिनांक १४ डिसेंबर २०१० ला वर्धा येथील नामदेव सभागृहात 
शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे 
प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार 
अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष 
शैलजा देशपांडे, कार्यकारीणी सदस्य प्रा.पांडुरंग भालशंकर, मराठवाडा प्रमुख श्री कैलास तवांर 
यांचे प्रमुख उपस्थितीत गंगाधर मुटे यांचा सत्कार समारंभ पार पडला. 
कार्यक्रमाचे संचालन श्री दत्ता राऊत यांनी केले.
कार्यक्रमाचा वृतांत पाहण्यासाठी आणि मा. शरद जोशी व मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.

=================

 
सत्कार समारंभ चित्रफ़ित-Title-भाग १

भालशंकर,तवांर,देशपांडे,सरोजताई - भाग २

====================

श्री देवांग आणि अ‍ॅड. चटप - भाग ३


 

============
सत्कार समारंभ - भाग ४

===========
गंगाधर मुटे यांचे भाषण - भाग ५

============
शरद जोशी यांचे भाषण - भाग ६

===========